जकात नमाज, रोजा आणि हजसारखी धार्मिक उपासना आहे. ती अल्लाहच्या आदेशाने त्यांनाच दिली जाईल, ज्यांना देण्याचा आदेश अल्लाहने दिला आहे. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे कोणत्याही वेळी नमाज अदा करू शकत नाही. नमाजच्या वेळेचे आणि नमाज अदा करण्याच्या पद्धतीचे ज्ञान असणे, त्यासाठी महत्वाचे आहे. मी सकाळी ८ ते ११ रिकामा असतो, कसलेही काम नसते म्हणून मी या वेळेत दिवसभराची नमाज अदा करून घेतो, असे म्हणता येत नाही. प्रत्येक नमाज त्याच्या वेळेवरच अदा करावी लागते. तसेच नमाज अदा करण्याची माझी स्वतःची एक पद्धत आहे, असे म्हणता येते का? नाही ना. हेच रोजांच्या बाबतीतही. रमजानचे रोजे अनिवार्य आहेत. प्रत्येकांवर नाहीत, सदृढ सशक्त व्यक्तीवर मात्र अनिवार्य आहेत. वृद्ध, आजारी, प्रवासी, लहान मुले, गर्भवती, रजस्वला आणि बाळंतीण यांना रमजानच्या रोजांबाबत सूट देण्यात आली आहे. यंदा रमजान भर उन्हाळ्यात आल्याने मला ते जमणार नाहीत, मी माझ्या सवडीनुसार पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात पूर्ण करेन, असे म्हणता येणार नाही. की मला दिवसभराचे निर्जलीय रोजे होत नाहीत, मी पाणी पिऊन रोजा पूर्ण करेन, असेही म्हणता येत नाही. अल्लाहने निर्धार...